CMO MAHARASHTRA
✔
6.51K subscribers
3.44K photos
133 videos
4 files
294 links
मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र राज्य यांचे अधिकृत चॅनल...
Download Telegram
धाराशिव जिल्हा रुग्णालयाच्या नवीन ५०० खाटांच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

आरोग्य मंदिरांचा कायापालट करण्यास प्राधान्य -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १५ :- राज्य शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे. राज्यातील जिल्हा रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये यांचा कायापालट करण्यात येणार असून या ठिकाणी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देऊन आरोग्य सेवेची ही मंदिरे अधिक सुसज्ज केली जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत धाराशिव येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार मनीषा कायंदे, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, माजीमंत्री रामदास कदम, ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.

सर्व सामान्यांना दर्जेदार आणि कमी खर्चात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. आरोग्य विभागाला यासाठी आवश्यक निधी व यंत्र सामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच स्वतंत्र सुपर स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणाले .

आमचे शासन हे दिलेला शब्द पाळणारे शासन असून धाराशिव येथे उभारण्यात येत असलेले ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय हे त्याचेच एक उदाहरण आहे. शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाखाहून पाच लाखापर्यंत उपचाराच्या खर्चास मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना यामुळे सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा विनासायास उपलब्ध होत आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतूनही गेल्या दीड वर्षात सुमारे 200 कोटीपर्यंत मदत दिली असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत असून जवळपास ३०० ठिकाणी हे दवाखाने सुरू झाले आहेत. आता कॅशलेस वैद्यकीय सेवा ही सुरू करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सांगली, सातारा जिल्ह्यात ‘स्मार्ट पीएचसी’ सारखा उपक्रम राबविला जात आहे, अशा उपक्रमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहेत. धाराशिव येथे उभारण्यात येत असलेल्या या रुग्णालयाचा औसा, उमरगा, बार्शी, परांडा या भागातील जनतेस लाभ होणार असून या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग नेहमीच दक्ष आहे. धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात होत असलेल्या या जिल्हा रुग्णालयामुळे या भागातील जनतेला चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी आणि आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
०००००
'आमची मुलगी' संकेतस्थळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई दि. १५ :- सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गर्भलिंग निदान प्रतिबंध लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या 'आमची मुलगी' (http://amchimulgimaha.in) या संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार मंदा म्हात्रे, आमदार मनीषा कायंदे, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार मनीषा कायंदे, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदर रामदास कदम, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी व सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आरोग्य सचिव नवीन सोना, आयुक्त धीरजकुमार, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महिलांसाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या 'आमची मुलगी' या संकेत स्थळामुळे मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होईल. तसेच अवैध काम करणाऱ्या प्रवृत्तीला अळाही बसेल.

'आमची मुलगी' या संकेतस्थळामुळे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवणे, गर्भलिंग निदान प्रतिबंध आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंधक) कायदा १९९४ आणि सुधारित कायदा २००३, (पीसीपीएनडीटी आणि एमटीपी) कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मदत होणार आहे.
तसेच संकेतस्थळावर तक्रार नोंदविणे आणि शंकाचे निरसन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तक्रार गोपनीय ठेवण्याची व तक्रारदाराची इच्छा असेल तर त्याचे नाव नोंदविण्याचीही संकेतस्थळावर व्यवस्था करण्यात आली आहे. संकेत संकेतस्थळावर प्राप्त तक्रारीचा निपटारा करून गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणार आहे. संकेतस्थळावर प्राप्त तक्रारीनुसार तपासणीमध्ये यश आल्यास खबरी बक्षीस योजनेअंतर्गत तक्रारदारास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. 
००००००
👍1