CMO MAHARASHTRA
✔
6.51K subscribers
3.44K photos
133 videos
4 files
294 links
मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र राज्य यांचे अधिकृत चॅनल...
Download Telegram
श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन तिथे उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला, तिथे औषधे आणि पुरेशा वैद्यकीय सोयी सुविधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पंढरपूर येथील सोयी-सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
-----------
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-----------
६५ एकर, चंद्रभागा वाळवंट, पत्रा शेड येथे प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
-----------
शासनाने यावर्षीपासून प्रत्येक दिंडीला जाहीर केलेले वीस हजार रुपये अनुदान खात्यात झाले जमा
-----------
वारकरी महामंडळ स्थापन; मुख्यालय पंढरपूर येथे राहणार
-----------
पंढरपूर येथे १५ लाख भाविकांना मोफत पाणी व ज्यूसच्या बाटल्यांचे वाटप करणार
-----------
एकादशीच्या दिवशी वाहतुकीचे योग्य नियोजन करा
-----------
पंढरपूर येथे एक हजार खाटांच्या रुग्णालयासाठी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश
-----------
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे सर्वसामान्य भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश
-----------
पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील रस्त्याच्या स्वच्छतेबद्दल मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाचे कौतुक

सोलापूर, दि. १४ - राज्य शासनाने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणासह पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सुचित केलेले होते. येथे वारकरी, शेतकरी व कष्टकरी यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे व हे शासन ही त्यांचेच आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्हीआयपी पेक्षा वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आषाढी वारीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, आमदार समाधान आवताडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचेसह महसूल, पोलीस, आरोग्य, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले की, पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भावी येतात व दर्शन रांगेत १८ तास उभे राहतात, अशा भाविकांना दर्शनाला प्राधान्य मिळाले पाहिजे या दृष्टीने व्हीआयपी दर्शन बंद करण्यासाठी प्रशासनाच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूरमध्ये येत असताना रस्त्याने देखील वारकऱ्यांच्या सगळीकडे दिंड्या, पालख्या येत होत्या व एक भक्तीमय वातावरण होते. पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील सर्व रस्ते स्वच्छ होते. प्रशासनाने चेंजिंग रूमची संख्या वाढवावी तसेच चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूला कचराकुंड्याची संख्या वाढवावी, आवश्यक मनुष्यबळ वाढवावे व संपूर्ण चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. पंढरपूर शहरातील एकाही पोलवर कोणाचेही कट आउट लावले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी व रस्ते मोकळे ठेवावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

१५ लाख भाविकांना पाणी व ज्यूसच्या बाटल्या मोफत वाटणार

पंढरपूर येथे येणाऱ्या १५ लाख वारकरी व भाविकांना मोफत पाण्याच्या बाटल्या व मँगो ज्यूसच्या बाटल्या देण्यात येणार आहेत. हे वाटप करीत असताना स्टॉलची संख्या वाढवावी, या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. सर्व भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध होईल व सर्व ठिकाणी स्वच्छता राहील याबाबत अधिक जागरुक राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

वारकरी महामंडळ स्थापन; पंढरपूर येथेच राहणार मुख्यालय

शासनाने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना केली असून याचे मुख्यालय पंढरपूर येथेच राहणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी देऊन पंढरपूर शहराचा सर्वंकश विकास आराखडा त्वरित सादर करावा. तसेच राज्य शासनाने वारकरी यांच्या प्रत्येक दिंडी 20 हजार रुपये जाहीर केलेले होते ते संबंधित दिंडीच्या बँक खात्यावर वितरित झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंढरपुरात एक हजार खाटांच्या नवीन रुग्णालयाचा प्रस्ताव देण्याचे निर्देश
👍3
पंढरपूर शहरात महत्त्वाच्या चार वाऱ्या असतात. या कालावधीत लाखो नागरिक येथे येतात. तसेच प्रतिमाह हजारो नागरिक येथे दर्शनासाठी येतात, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने १ हजार खाटांच्या नवीन रुग्णालयासाठी स्वतंत्र प्रस्ताव आरोग्य विभागाने तात्काळ सादर करावा, त्यासाठी आवश्यक असलेला निधीही उपलब्ध करून देण्यात येईल. त्याप्रमाणेच नियोजित स्कायवॉक आणि दर्शन मंडपासाठी प्रशासनाने सादर केलेल्या १०० कोटींच्या प्रस्तावात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र सोय करून तिरुपतीच्या धर्तीवर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

वाहतुकीचे योग्य नियोजन करा; भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या
आषाढी एकादशी साठी पोलीस विभागाने वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. पंढरपूर शहरात आलेल्या वारकरी व भाविकांना आपल्या वाहनाच्या ताफ्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. वारी कालावधीत हजारो पोलीस कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था योग्य प्रकारे व्हावी याकरिता आवश्यक असलेला निधी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याबाबत शासन विचार करत आहे. पंढरपूर येथील आषाढी कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र निधी या पुढील काळात देण्याबाबत शासन सकारात्मक आहे त्या अनुषंगाने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होण्यासाठी जे साऊंड सिस्टिम निर्माण केली आहे त्याच्यावर भजन पूर्ण वारी कालावधीत व्यवस्थितपणे सुरू राहिले पाहिजे याची दक्षता प्रशासनांनी घ्यावी तसेच ग्राम विकास विभागाकडील वारीच्या अनुषंगाने देण्यात येणारा निधी हस्तांतरित केल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आषाढी वारी संपल्यानंतर स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण शहर तीन ते चार दिवसात स्वच्छ होईल यासाठी नियोजन करावे तसेच आषाढी दिवशी वाहतूक नियंत्रण योग्य राहील याची दक्षता घ्यावी त्याप्रमाणेच पंढरपूर शहरात नवीन एक हजार बेड साठी आवश्यक असलेला निधी आरोग्य विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे वारी कालावधीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था भैरवनाथ शुगरच्या सीएसआर फंडातून करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी 65 एकरवर येणाऱ्या दिंड्याच्या सोयीसुविधासाठी एक चांगला विकास आराखडा तयार करून शासनाला सादर करावा. वारकरी मंडळ पंढरपूर येथेच होणार आहे त्यासाठी जागा उपलब्ध करून ठेवावी तसेच शहरात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे अशा सूचना दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त यांनीही ज्या दिंड्यांची नोंदणी झालेली आहे त्या दिंड्यांना शासनाने जाहीर केलेले वीस हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती दिली. पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी कायदा व सुव्यवस्था बाबत माहिती देऊन आषाढीच्या दिवशी वाहतुकीचे अत्यंत कटाक्षाने नियोजन करण्यात येईल असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्यावतीने वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची माहिती सांगितली.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधा विषयी माहिती दिली. तसेच वारी कालावधीत कोणत्याही भाविकाला सुविधा अपुऱ्या पडणार नाहीत त्याची काळजी प्रशासन घेत असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री व मंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सुविधांमध्ये आणखी वाढ करून घेण्यात येईल असे सांगितले. तसेच स्कायवॉक आणि दर्शन मंडपासाठी प्रशासन प्रस्ताव तयार करत असून तो तिरुपतीच्या धर्तीवर असल्याचेही त्यांनी सांगितले.
000000000
👍1
महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व  वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’… सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध
https://dhunt.in/VB8PR
देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा, राज्यातील सर्व ज्येष्ठांना लाभ! ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा शासन निर्णय जारी
https://dhunt.in/VAsHM

By CMO MAHARASHTRA via Dailyhunt
❤2
*मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

नवी मुंबई, दि. १६ :- डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे ५ लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले.

कळंबोली, नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज भेट देऊन जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शासन आपल्या पाठिशी असल्याचे रुग्णांना सांगितले. जखमींवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी उपचाराबाबत अधिक माहिती जाणून घेतली. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात स्थलांतरित करावे लागल्यास तसे करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

खासगी बस आणि ट्रॅक्टर यांच्या मध्ये झालेल्या अपघातात ४६ जखमी आहेत. त्यापैकी ७ वारकरी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्र्यांनी झालेल्या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

००००
👍1
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमाचा समारोप*

*पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 'एक वारकरी एक झाड' ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प करूया-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*


*मुख्यमंत्र्यांचे हस्ते जिल्हा प्रशासनाच्या महासंस्कृती स्मरणिकेचे प्रकाशन झाले

सोलापूर, दि. १६ : वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 'एक वारकरी एक झाड' ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत,आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.अविनाश ढाकणे, संचालक नितीन गोरे, सिद्धांत कदम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महाराष्ट्र कला संस्कृती मंचचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' हा उपक्रम गेल्या १४ वर्षापासून राबविण्यात येत असून याला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या विभागांने आषाढी वारी पुरतेच मर्यादित न राहता राज्यातील गावा गावात पर्यावरणा विषयी नागरिकांमध्ये जनजागृतीची मोहिम राबवावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निधीची चिंता करू नये, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जगद्गुरु संत तुकाराम यांच्या 'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' या अभंगाप्रमाणे आपल्याला हरित महाराष्ट्र करावयाचा आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करून वातावरणातील उद्याचा धोका टाळावयास मदत करणे आवश्यक आहे. जागा मिळेल तिथे वृक्ष लागवड करावी. एक झाड आईच्या नावाने लावून त्याचे संवर्धन करावे. असे केल्यानेच अतिवृष्टी, प्रदूषण, अवेळी पडणारा पाऊस यावर मात करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सर्व शेती पंप सौर उर्जेवर रूपांतरित करण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा, मागेल त्याला शेततळे, वारकऱ्यांसाठी महामंडळाची स्थापना, दिंडीला २० हजार रुपये अनुदान देत आहोत. सर्व धर्मियांसाठी तीर्थ यात्रा योजना अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. संत ज्ञानेश्वर यांचे जन्म ठिकाण नेवासा येथे विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. शेतीत चांगले काम झाल्याने या वर्षी राज्याला कृषी पुरस्कार प्राप्त झाला आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

राज्यात २० लाख हेक्टर बांबू लागवड करण्याचे धोरण आहे. त्यासाठी हेक्टरी सात लाख रुपये अनुदान देत आहोत. बांबू मुळे २० टक्के ऑक्सिजन अधिक मिळतो. सौर ऊर्जा वापर करण्यासाठी धोरण आखलेले आहे. प्रत्येक महापालिकेस एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. पंतप्रधानांनी देखील आईच्या नावे एक झाड लावण्यास सांगितले आहे. पर्यावरण समतोल सावरण्यासाठी वृक्षारोपण करण्याची गरज आहे. त्यासाठी झाडे लावण्याची गरज आहे. हरित महाराष्ट्र करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे आवाहनही श्री शिंदे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, महसूल मंत्री श्री. विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भजनाचा टाळ वाजवत ठेका धरत ज्ञानोबा तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी असा गजर करत वारकरी भक्तांसोबत दंग झालेले पाहायला मिळाले.

*यावेळी जिल्हा प्रशासनाच्या महासंस्कृती स्मरणीकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.*

यावेळी महाराष्ट्र कला संस्कृती मंचचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, श्रीमती चंदाबाई तिवाडी, शाहीर देवानंद माळी, श्रीमती लता शिंदे यांच्यासह अन्य कलाकारांनी किर्तन, भारुड, पोवाडा यांच्या माध्यमातून टाळ मृदुंगात हरिनामाचा गजर करत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम सादर केले.
***
👍1