CMO MAHARASHTRA
✔
6.5K subscribers
3.44K photos
133 videos
4 files
294 links
मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र राज्य यांचे अधिकृत चॅनल...
Download Telegram
शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवछत्रपतींचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा


सातारा, दि. १९: शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचे, वीरतेचे प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्याच्या पवित्र भूमीत दाखल झाली आहेत हा महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे 'शिवशस्त्रशौर्यगाथा' अंतर्गत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. संग्रहालयात मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभुराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार सर्वश्री
श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत, मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशनकुमार शर्मा, आंतरराष्ट्रीय व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचे कार्यालय प्रमुख निकोलास मर्चंट, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. यावेळी ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग अशा चार टपाल तिकीटांचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा असून त्यांची शिकवण तत्वे अंगिकारल्यास आयुष्याची लढाई आपण सहज जिंकू. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या, कर्तुत्वाच्या खुणा जिथं कुठं असतील तिथून त्या शिवप्रतापाच्या भूमीत पुन्हा आणल्या जातील. लंडनहून सातारा येथे आणण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या वाघनख्यांच्या दर्शनातून त्यांच्या पराक्रमाचे दर्शन घडते. ही वाघनखे म्हणजे त्यांची वीरगाथा आहे. संघर्ष जेवढा मोठा तेवढे यश ही मोठे हे त्यांच्या जीवनातील विविध घटनांमधून दिसून येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवरायांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य साकार करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून समाजातील सर्व घटकांसाठी अनेक हिताचे निर्णय शासनाने घेतले आहेत. विविध योजना शासन राबवित असून त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गड-कोट किल्ल्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती हे काम करेल. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी १५० कोटीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा महाराणी ताराबाई यांच्या संगममाहूली येथील समाधी स्थळाचा जीर्णोद्धार राज्य शासन करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक राजे होते. त्यांनी मुघल सत्तेला पराभूत करुन रयतेचे राज्य स्थापन केले. स्वराज्यावर चालून आलेले संकट अफजलखानाचा वध करताना त्यांनी ज्या वाघनखाचा उपयोग केला ती वाघनखे अनेक वर्ष लंडनच्या म्युझीयममध्ये ठेवण्यात आली होती. ती वाघनखे साताऱ्यात संग्रहालयामध्ये शिवप्रेमींच्या दर्शनासाठी उपलब्ध झाल्याने प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडण्याची संधी मिळाली आहे. शिवरायांनी जातीभेद न करता रयतेचे राज्य प्रस्थापित केले. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील व्यक्ती ही वाघनखे पाहण्यासाठी येईल व त्यातून प्रेरणा घेईल. छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन राज्य शासन काम करत असून राज्यात अनेक विकासात्मक प्रकल्प, योजना सुरु आहेत. शेवटच्या घटकाचा विचार करत प्रत्येकाच्या उत्थानासाठी शासन काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
❤1👍1
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, नवीन पिढीला इतिहास कळावा यासाठी शिवछत्रपतींची वाघनखे प्रेरणादायी आहेत. जगातून निघून जाण्यापूर्वी प्रत्येकाने एकदा का होईना ही वाघनखे पहावीत. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याचे सांगून यापुढेही विकासकामांच्या प्रस्तावांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राजगडच्या पायथ्याशी मौजे पाल ता. वेल्हा येथील राजमाता सईबाई स्मृतीस्थळ आराखड्याला ३० कोटींचा निधी, वडजल ता. जुन्नर येथील शिवनेरी संग्राहलयाला ३०० कोटी, मौजे तुळापूर हवेली येथील छत्रपती संभाजी महाराज बलीदान स्थळाच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. शिराळा सांगली येथे स्मार, प्रतागपडच्या पायथ्याशी वीर जीवा महाला यांच्या स्मारकासाठी जागा निवडण्यात आली आहे. रायगड किल्ल्यावर शिवराज्यभिषेक सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. शिवनेरीच्या विकासासाठी देखील आराखडा तयार करुन निधी देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे इंदापूर ऐतिहासिक घडीच्या स्मरणार्थासाठी ४० कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.

श्री. पवार म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन, संवर्धनाकरिता विशेष निधीची तरतूद केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणारा वेल्हा तालुक्याच नाव आता राजगड करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रतापगड, रायगड, शिवनेरी, याबाबतच्या कुठल्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही. तरुण किल्ल्यांवर मद्यपान करता याबाबत अधिक कायदा कडक करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीचे जनक होते. छत्रपती शिवरायांच्या सर्व वस्तू अनमोल आहेत. त्यांची वाघनखे साताऱ्यात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आजचा दिवस सर्वांसाठी अभिमानाचा, गौरवाचा दिवस आहे. महाराष्ट्राचा इतिहास गौरवाने सांगणाऱ्या ज्या वस्तू लंडन अथवा अन्य देशाच्या वस्तूसंग्रहालयात असतील त्या वस्तू महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. श्री. मुनगंटीवार म्हणाले, शासनाने महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शिवराज्याभिषेक दिवस हा शासकीय कार्यक्रम साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. संसदभवनमध्ये शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवाहरलाल नेहरु विश्व विद्यालय दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यासन निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 10 कोटी रुपये दिले. आयआयएम नागपूर येथेही शिवाजी महाराजांच्या राज्याची मॅनेजमेंट शिकवली जाणार आहे. त्यासाठी 5 कोटी रुपये दिले आहेत. आग्रा येथील दरबारात शिवजयंती गेल्या दोन वर्षापासून साजरी होत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखा, गड-किल्ल्यांवर मद्यप्राशन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, छत्रपती ‍शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श झालेली वाघनखे सातारा नगरीत येणे ही संपूर्ण जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे. हिंदवी स्वराज्यावरील मोठे संकट ज्या वाघनखांच्या माध्यमातून त्यांनी नष्ट केले ती वाघनखे प्रत्यक्ष पाहण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ही वाघनखे सात महिने सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये राहणार आहेत. याची तिकीटे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. दिवसभरातून चार स्लॉट उपलब्ध आहेत. एकावेळी दोनशे लोक हे प्रदर्शन पाहू शकतील. प्रशासनाने यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. याचा सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.

यावेळी श्री. देसाई यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करुन छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्याचा मान सातारा जिल्ह्याला दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानले.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, त्यांनी सर्वधर्मसमभाव शिकविला. त्यांचे राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे व्हावे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा. शिवराज्यातील ठिकाणांचे सर्किट निर्माण करावे. कोणत्याही वादविवादाला वाव राहू नये यासाठी शासनाच्या वतीने अधिकृत शिवचरित्र प्रकाशित करावे. देशाला एकसंघ ठेवण्याची ताकद शिवचरित्रात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
👍2
आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारा या ठिकाणी आणणे हा जीवनातील भाग्याचा क्षण आहे. या माध्यमातून इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या वतीने वाघनख्यांबाबत निर्माण झालेले वादविवाद टाळण्याचे, अफवा न पसरविण्याचे आवाहनही केले. अजिंक्यतारा किल्ला दुर्लक्षित असून त्यांच्या संवर्धनासाठी पर्यटकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी वाढीव निधी उपलब्ध करुन देण्याची मागणीही केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, श्री. पवार यांनी शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
👍3
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'धर्मवीर -२ मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, झी समूहाचे पुनीत गोएंका, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सलमान खान, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, बोमन इराणी, अभिनेते गोविंदा आहुजा, अभिनेत्री रकुलप्रीत सिंह, अभिनेता जॅकी भगनानी आदी उपस्थित होते.

मंगेश देसाई आणि उमेशकुमार बन्सल यांनी 'धर्मवीर - २' या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.
👍1
👍1
हवामान खात्याने आज मुंबईसह कोकणातील आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
प्रशासनाने हवामान खाते, आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेऊन त्यानुसार नियोजन. व्यवस्थापन करावे असे सांगतानाच सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी. हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा विविध सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
👍6
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश..
👍1
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील.
🙏6👏2
समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

मुंबई, दि. २२:- समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय आज येथे घेण्यात आला. या समितीने कालबद्ध पद्धतीने काम करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या विषयावर सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस आमदार सर्वश्री भरतशेठ गोगावले, ज्ञानश्वर म्हात्रे, किशोर दराडे, जगन्नाथ अभ्यंकर, माजी आमदार ॲड. मनिषा कायंदे, तसेच शिक्षक प्रतिनिधींचे शिष्टमंडळ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठी, दर्जेदार शाळांसाठी काम ही मंडळी काम करतात. या सर्वांना न्याय द्यायचा आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाबाबत अन्य राज्यांत काय परिस्थिती आहे, याचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी सर्वंकष अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे काम ही समिती करेल. यात या शिक्षक प्रतिनिधींचाही समावेश राहील. या समितीने कालबद्ध पद्धतीने काम करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आमदार सर्वश्री म्हात्रे, अभ्यंकर, दराडे आणि माजी आमदार ॲड. कायंदे यांचा समावेश राहणार आहे.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक आर. विमला आदी उपस्थित होते.

000
👍2
सर्वसामान्यांना दिलासा;विकसित भारत संकल्पनेला बळ

पंतप्रधानांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास ठरविला सार्थ

'नवरत्न' अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई, दि. २३: कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, रोजगाराला चालना देणारा आणि 'विकसित भारत' संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

शेतकऱ्यांना बळ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गरीब, महिला, युवा, शेतकरी या घटकांवर भर देतानाच कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद तसेच शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरविण्याचा निर्णय हा कृषी क्षेत्राबरोबरच शेतकऱ्यांना बळ देणारा आहे. त्याचबरोबर एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य शासनाने देखील महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी पावले उचलल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नविन कररचना ही सामान्यांना, नोकरदारांना दिलासा देणारी असून त्याचे मी स्वागतच करतो. या नव्या कररचनेमुळे करदात्यांची संख्याही वाढेल. यातून विकासाला आवश्यक असणारे करसंकलनातही महाराष्ट्रात अग्रेसर राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागाचा कायापालट

या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा या नऊ घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आल्याने सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगत ग्रामीण भारताच्या विकासासाठी केलेली २.६६ लाख कोटी रुपयांची तरतूद खेड्यांचा कायापालट करणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

५० लाख अतिरिक्त रोजगार

आपला देश युवांचा आहे असे नेहमी म्हटले जाते. त्याचे प्रतिबिंब आजच्या अर्थसंकल्पात पहायला मिळाले असून युवा वर्गासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत पहिल्यांदाच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना एक महिन्याचा भत्ता पहिल्या महिन्यात देण्याचा निर्णय हा युवांसाठी दिलासा देणारा आहे. ५० लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याचा देखील निर्धार अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील युवकांनाही रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे.

देशातील ५०० अग्रणी कंपन्यांमध्ये युवकांना इंटर्नशिप संधी मिळणार असून पाच वर्षांत सुमारे एक कोटी तरुणांना याचा फायदा होणार आहे. कौशल्य विकासासाठी जाहिर केलेल्या नवीन योजनेद्वारे राज्य सरकार व उद्योगविश्व यांच्या संयुक्त विद्यमातून ५ वर्षांच्या काळात २० लाख युवकांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुद्रा योजनेतून दुप्पट कर्ज देण्याचा निर्णयही युवांना सक्षम करणारा आहे.

पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटी

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आला आहे. देशात पायाभूत सुविधा उभारणी कामात महाराष्ट्र अग्रेसर आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ११ लाख कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या खासगी गुंतवणुकीला सरकारी धोरणांमधून प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक पाठबळ मिळेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. देशभरात रस्तेबांधणीसाठी २६ हजार कोटींचा खर्च केला जाणार असल्याने दळणवळणाचे जाळे मजूबत होणार आहे. देशभरात १२ इंडस्ट्रियल पार्कला नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत मंजुरी देण्याचा निर्णय हा उद्योगक्षेत्राला भरारी देणारा आहे.

देशभरातील २५ हजार गावांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना टप्पा ४ सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेद्वारे सौर ऊर्जेला चालना मिळणार असून अर्थसंकल्पातील तरतुदी आणि योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासात मोठी भर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

०००००
👍3